माझं गावचं मंदिर शोभलं !
“जिवा भावानं जव मी पाहीलं,माझ गावचं मंदिर शोभलं”या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामविकासाची गोडवी गाणाऱ्या भजनातील प्रत्येक ओळीचे दर्शन पाटोदा ता.जि.औरंगाबादने घडविले आहे.औद्योगिकरणामुळे मेगासिटीची चाहुल लागलेल्या औरंगाबाद शहारापासुन अवघ्या १३ कि.मी.अंतरावर खामनदीच्या तिरावरील पाटोदा-गंगापुर नेहरी या जुळ्या गावांनी ग्रामविकासात उत्तुंग झेप घेतली आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाव्दारे २ ऑक्टोंबर २००५ रोजी गावात ग्रामोन्नतीची मुहुर्तमेढ घट्ट रोवण्यात आली,अन् अवघ्या ७ वर्षात गावाचे संपुर्ण स्वरुपच पालटले .निर्मलग्राम,पर्यावरण संतुलीत सम्रुध्द ग्राम या मानांकित पुरस्काराने महामहिम राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानीत होण्याचे भाग्य गावाला दोन वेळा प्राप्त झाले आहे.नुकताच आदर्शगाव पाटोदाला पंचायतीराज अभियान अंतर्गत यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार (२०११-१२)मिळाल्याने गावकिर्तीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.सन २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.
गावाची पुर्वस्थिती
औद्योगिकक्षेत्र वाळुजच्या अगदी जवळच आसलेल्या पाटोदाची पुर्वस्थिती फारच बिकट होती.ग्रामस्वच्छता अभियानाचा सुगंध पाटोदा येथे पोहचण्या पुर्वी गावात सर्वत्र घाणीची दुर्गंधी सुट्ली होती. गावाच्या चारही बाजुने उघड्यावर शौचास जाण्याची घाणेरडी व लाजीरवाणी सवय ग्रामस्थांना जड्ली होती.गावात सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य होते. नाल्या, गटारे जागोजागी तुंबली होती.गावात अस्वच्छतेमुळे रोगराईने कायमचे घर केले होते.ग्रामस्वच्छता अभियानात दृढ निर्धाराने सहभागी झालेल्या ग्रामस्थानी पाटोदाच्या ग्रामविकसाचे शिल्पकार श्री भास्करराव पेरे पाटील यांच्या ग्रामविकासाच्या हाकेला मनापासुन साथ दिली अन् अवघ्या वर्षभरातच संपुर्ण गाव १०० टक्के पाणंदमुक्त झाले.त्यानंतर ग्रामविकासात पाटोदाने कधीचमागे वळुन बघितले नाही.आज ग्रामोन्नतीची अनेक यशोशिखरे पाटोदाने सर केले आहेत.ग्रामविकासाचे अनेक नाविन्यपुर्ण उपक्रम राबवुन व ग्रामस्थांच्या सर्वागीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या ग्रामपंचायतची आता ग्रामविकासाशी पक्के नाते जोडले गेले आहे.
गावाची भौगोलिक स्थिती
पाटोदा आणि गंगापुर ची एकुण लोकसंख्या ३३५३ आहे.गावात एकुण पुरुष १६४९ व स्रिया १६०४ आहेत. गावाचे एकुण क्षेत्रफळ १५० चौरस कि.मी.आहे. गावाच्या सभोवताली जवळपास १५०० एकर शेत जमिन असुन त्यातील बहुतांशी जमिन बागायती आहे.ऊस कापुस व गहु ही मुख्य पिके आहेत.
शाळा व अंगणवाडी
गावात जिल्हापरिषदेची शाळा असुन विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी पर्यंत गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. सर्व विद्यार्थ्याना लोकसहभागातुन दरवर्षी ऑक्टोंबर ते जानेवारी पर्यंत लोकवर्गणीतुन मोफत दुध वितरण करण्यात येते तसेच सकस आहारासाठी कमीपडणारा निधी ग्रा.पं.उपलब्ध करुण देते. गावात लहान बालकांसाठी ३ अंगणवाड्या असुन तिनही अंगणवा –ड्यासाठी इमारती व वर्गखोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी
पाटोदा हे गाव शहरातुन घाण पाणी घेऊन वाहणाऱ्या खाम नदीच्या तिरावर असल्यामुळे गावातील भुमिगत जलसाठा दुषित झाला आहे.यामुळे गावाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडुन पिण्याचे पाणी ग्रामपंच्यायतिने विकत घेतले आहे. घरोघरी जलवाहिनीव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन पाणी मिटरच्या आधारे देण्यात येते व पाणीपट्टी वसुल करण्यात येते.
ग्रा.पं.ने आकारलेले पाण्याचे दर
१)सामान्य पाणीकर -३०० रु प्रतिवर्षी
२)खास पाणीकर -६०० रु प्रतिवर्षी
३)एम.आय.डी.सीचे पाण्याच्या टाकीवरुन आणणे- ५०० रु प्रतिवर्षी
४) एम.आय.डी.सी.नळ कनेन्शन मीटर ने -१२ रुपये प्रति लीटर
१०० टक्के कर वसुली
पाटोदा व गंगापुर चे ग्रामस्थ दरवर्षी ग्रा.पं. चा सर्व कर वेळेवर भरतात. करवसुलीचे प्रमाण १००% असुन काही करदाते सर्वकर मुदतपुर्व अदा करतात.अशा करदात्यांचा सत्कार ग्रा.पं.तर्फे भेटवस्तु देवुन करण्यात येतो.
पर्यावरण संतुलित सम्रुध्द ग्राम
गावात एकुण लोकसंख्या इतकेच सर्वच प्रकारचे झाडे लावण्यात आले असुन पर्यावरण संतुलित सम्रुध्द ग्राम योजना राबविण्यात आली आहे.या योजेनेव्दारे गावातील प्रत्येक कुटुंब वृक्ष संवर्धनाची जाबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आहे.
ग्रा.पं.चे नाविन्यपुर्ण उपक्रम
मोफत पिठाची गिरणी
सदरील योजना ही ग्रापंने सन २००९-१० या वर्षी चालु करण्यात आली.त्यामुळे ग्रामपंचायतीला घरी टॅक्स मागायला जायची गरज पडत नाही. तसेच दर वर्षी खातेदारांमध्ये वाढ होते. वर्षाकाठी ९० ते ९५% वसुली होते. ग्रामपंचायत तर्फे गावात धान्य दळण्यासाठी मोफत पिठाच्या २ गिरण्या सुरु करण्यात आल्या आहेत.या अभिनव उपक्रमाचा लाभ ग्रा.पं.चा कर भरणारे प्रत्येक कुटुंब घेत असुन त्यांना वर्षभर मोफत दळुन दिले जाते.वाढदिवस
ग्रामपंचायतीव्दारे गावातील प्रत्येक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा त्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात येवुन वृक्ष भेट देवुन वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात येते.सी.सी.टी.व्ही कॅमेरे
ग्रा.पं.मार्फत गावात शाळा ,कार्यालय व महत्वाच्या ठिकाणी एकुण ३२ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सी.सी टी व्ही कॅमेरामुळे नोकरवर्गावर नियंत्रणठेवले जाते तसेच गावातील प्लॉस्टिक बंदी , गुटका बंदी ,सांडपाणी व्यवस्थापन ,कचरा व्यवस्थापन व गावाची सुरक्षा करीता मदत होते.सामुहिक भोजन
लोकसहभागातुन प्रत्येक महिन्याच्या ३ऱ्या शनिवारी संपुर्ण नागरिकासांठी समुह भोजनाचे आयोजन करण्यात येते .या दिवशी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येत असुन हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येतो.कचरा व्यवस्थापन
गावातील प्रत्येक घरांसमोर ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी २ कचरा कुंड्याची व्यवस्था ग्रा. पं . तर्फे करण्यात आली आहे. कचरा संकलित करुन कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करण्यात येते.तसेच प्रत्येक घराला प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी पर्यावरण पिशवी देण्यात आली असुन प्रत्येक शनिवारी सदरील प्लॅस्टिक गोळा केले जाते. व नंतर ग्रा.पं.प्लॅस्टिकची विक्री करते.कुपोषण मुक्त अंगणवाडी
अंगणवाडीतील सर्व बालकांना दररोज सकस आहार देण्यात येत असुन अंगणवाड्यानी कुपोषण मुक्तीत उल्लेखनीय कामगीरी बजावली आहे.आय.एस.ओ मानांकन
ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज आय.एस.ओ.कार्यप्रणाली नुसार करण्यात येत असुन आय.एस.ओ. मानांकन प्रमाणप्रत्र ग्रा.पं.व अंगणवाडीला प्राप्त झाले आहे.सौर दिवे व बायोगॅस
गावात विविध ठिकाणी १५ सौर दिवे लावण्यात आले असुन बायोगॅसचे एकुण ११ प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत . त्यापैकी बायोगॅसचे २ प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले आहेत.वटवृक्ष आणि महिला
वटपोर्णिमेनिमित्त गावातील महिलांना वट्वृक्षाच्या रोपट्यांची ग्रा.पं कडुन भेट देण्यात येते तसेच महीला बचत गट आणी विविध प्रशिक्षणाचा लाभ महिलांना देण्यात येत आहे. गावातील प्रत्येक घरावर घर क्रमांक ग्रा.पं.ने नोंदविले असुन त्यावर कुटंब प्रमुख पुरुष व महिलेचे नाव दर्शविण्यात आले आहे.ग्रामउत्सव
गावात श्री हनुमान व महादेवाचे दोन मंदिरे असुन दसरा या दिवशी गावातिल सर्व लोक एकत्र जमवुन धार्मिक ,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. याशिवाय अनेक लोककल्याणकारी उपक्रम ग्रा.पं.ग्रामस्थांच्या सहकर्याने राबवित आहे.